पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

Pune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2024, 01:30 PM IST
पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ title=
pune news Minor boy on a speeding bike tries to kill group of people in pune alandi

Pune Crime News: पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असतानात आळंदीतही अशीच एक घटना घडली आहे. अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. वडगाव घेणंद येथील ही घटना आहे. 

आळंदी पोलिसांत या प्रकरणी तक्रर दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणार हा थरार मनात धडकी भरवणारा आहे. इतकंच नव्हे तर हा अपघाताचा थरार झाल्यानंतर सदर तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता. 

पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

आळंदी पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. हा अल्पवयीन मुलगा कोण आहे आणि हे कृत्य कशामुळं घडलं हे मात्र, अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी पोलिस तपास करत असून या प्रकरणी लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून व पीडितांकडून करण्यात येत आहे.