शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल...

Pune News : काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हा मुद्दा पुढे आणून सरकारवर जोरदार टीका केली होती

Updated: Feb 27, 2023, 02:32 PM IST
शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल... title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याला (Farmer) कायमच संकटाला सामोरं जावं लागत आहे. चांगलं पीक पिकवूनही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूरमध्ये (Solapur) काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदा (Onion Price) विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये मिळाले होते. असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune News) समोर आलाय. पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचे (brinjal) फक्त 66 रुपये मिळाले आहेत. यानंतर संपातलेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचे फक्त 66 रुपये मिळाले आहेत. पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये हा सर्व प्रकार घडलाय. केवळ 66 रुपये मिळाल्याने संपातलेल्या शेतकऱ्याने कुटुंबासह आपल्या 11 गुंठे शेतातील वांग्याचं पीकच उपटून टाकलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला. 

तीन महिने कष्ट करून पिकविलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघला नसल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. राज्यकर्त्यांनी एकमेकांची उणीधुनी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं असेही या शेतकऱ्याने म्हटलं आहे. दरम्यान राज्यात सर्वच शेतमालाचे भाव पडलेत. त्यामुळे शेतकरी हैराण झालाय.

दरम्यान, सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी पाच क्विंटल कांदा सोलापूर मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे विकल्यानंतर त्यांना केवळ दोन रुपये मिळाले होते.  या व्यापाऱ्याने राजेंद्र चव्हाण यांना चेकच्यामाध्यमातून ही रक्कम दिली होती. गाडीभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन राजेंद्र चव्हाण यांना फक्त दोन रुपये मिळाले होते.

व्यापाऱ्यावर अखेर कारवाई

या धक्कादायक प्रकारानंतर सुर्या ट्रेडर्सच्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी त्यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र समाधानकारक उत्तर न दिल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आला.