स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले, भाजप कार्यकर्तेही उतरले रस्त्यावर

महागाईविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक, हॉटेल मेरियटमध्ये घुसण्याचा प्रयत्न

Updated: May 16, 2022, 05:47 PM IST
स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले, भाजप कार्यकर्तेही उतरले रस्त्यावर title=

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) एका कार्यक्रमानिमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या ज्या मॅरियट हॉटेलमध्ये स्मृती इराणी थांबल्या आहेत. त्या हॉटेल परिसरात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

या आंदोलनामुळे पुण्यात हायव्होल्टाज ड्रामा रंगला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बांगड्या आणल्या होत्या. स्मृती इराणी यांना बांगड्या द्यायच्या आहेत, त्यांच्याशी बोलायचं आहे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

मनमोहन सिंग यांच्या काळात स्मृती इराणी यांनी महागाईविरोधात आंदोलन केलं होतं, त्यावेळी त्यांनी तात्कालीन पंतप्रधानांना बांगड्या पाठवण्याचं विधान केलं होतं.  त्याचप्रमाणे आता आम्ही महागाईविरोधात स्मृती इराणी यांना बांगड्या देणार यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाम होते. 

त्याआधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही स्मृती इराणी यांच्याविरोधात आंदोलन केलं. महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात चूल आणि बांगड्या घेऊन आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्या ठिकाणी स्मृती इराणी यांचा कार्यकर्म होणार आहे त्याठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.