सागर आव्हाड, झी मीडिया
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका इराणी विद्यार्थ्याची फसवणूक करुन त्याला लुबाडण्यात आल्याची घटना घडली आहे. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कोरेगाव पार्क परिसरात घडली घटना असून या प्रकरणी मुस्तबा अकबर अरेबियन (३०) याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Live News In Marathi)
मुस्तबा हा मुळचा इराणी विद्यार्थी असून पुण्यात शिक्षणासाठी आला होता. भविष्य बघायला गेला असता काही चोरट्यांनी त्याला मारहाण करत लुबाडले आहे. तसंच, मोबाइल अॅपवरुन 95 हजार रुपये चोरट्यांनी ट्रान्सफर केल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तबा हा शैक्षणिक व्हिसावर पुण्यात शिक्षण घेत आहे. तो पुण्यातच सध्या वास्तवाशी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची तीन जणांसोबत ओळख झाली होती. या तिघांनी तुझे भविष्य सांगू असं सांगत त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांनी भेटायचे नियोजन केले. मुस्तबादेखील त्यांना भेटण्यासाठी तयार झाला
तिघांनी कट रचून मुस्तबाला कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. 3 ऑक्टोबर रोजी मुस्तबा आरोपींना भेटण्यासाठी हॉटेलमध्येदेखील गेला. मात्र, तिथे गेल्यानंतर भविष्य सांगण्यासाठी या ठिकाणी फारच आवाज आहे, असा बहाणा बनवत आरोपी मुस्तबाला एका गाडीत बसवून ते लेन क्रमांक सहा मध्ये घेऊन गेले.
सुनसान जागी येताच तिघा आरोपींनी मुस्तबाला चाकू आणि फायटरचा धाक दाखवला आणि हाताने मराहाण केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्याच्या मोबाईल ॲप वरून ९५ हजार रुपये काढून घेतले आणि तिथून फरार झाले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.