Maharashtra Politics : पुण्यातील भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) यांच्या निधनाला चारच दिवस झाले आहेत. असे असताना पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्या रुपाली पाटील (Rupali Thombre Patil) यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीकडून (NCP) निवडणूक लढवण्याची तयारी रुपाली पाटील दर्शवली आहे. ही पोटनिवडणूक (Bye Elections) बिनविरोधक न होता त्याजागी मतदानाच्या माध्यमातून लोकांनी प्रतिनिधी निवडूण द्यावा अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे.
खासदारही आजारी असतात - रुपाली पाटील
"मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांच्याघरात तशी कोणती व्यक्ती नाही. त्यांचे पती आणि मुलाचा राजकारणात तेवढा सक्रिय सहभाग नाही. पण दुखःद नियम झाल्यानंतर आमच्याच घरात पद यायला हवं असा काही नियम नाहीये. भावनिक म्हणून आपण विचार करु शकतो. पण हाच भावनिक विचार भाजपने का नाही केला हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. मुक्ता टिळक आजारी असल्याने कसबा मतदारसंघातील बरीच कामे झालेली नाहीत. तसेच खासदारही आजारी आहेत. त्यामुळे काम करणारी व्यक्ती निवडून आली तर मतदारसंघातील लोकांची कामे होऊ शकतात. जर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि राष्ट्रवादी पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे," असे रुपाली पाटील म्हणाल्या.
हसत खेळत निवडणूक पार पडणे गरजेचे
"निवडणूक झाल्यापासून मुक्ता टिळक आजारी होत्या. आजारात सुद्धा त्यांना जेवढे शक्य होते तेवढं त्यांनी काम केले आहे. पोटनिवडणूक झाल्यावर मतदार संघातील लोक ठरवतील की कुणाला निवडून द्यायचे आहे ते. त्यामुळे जी पोटनिवडणूक लागणार आहे ती हसत खेळत पार पडणे गरजेचं आहे," असेही रुपाली पाटील म्हणाल्या.
राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?
मनसेत आक्रमक महिल्या नेत्या म्हणून ओळख मिळवेल्या रुपाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अंतर्गत कलहातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. एक आक्रमक नेत्या म्हणून त्या परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे सध्या त्या चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे आता रुपाली पाटील यांनी आमदारकीसाठी दावा सांगितल्यानंतर पक्ष त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पक्षातूनच विरोध?
आमदाराकीसाठी इच्छुक असलेल्या रुपाली पाटील यांना पक्षातूनच विरोध होतो आहे का अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. याला कारण ठरला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेला इशारा. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेचे शोषण केल्याचे प्रकरण सध्या तापलेलं आहे. अशातच रुपाली पाटील यांनी याप्रकरणातील महिलेचा चेहरा उघड केल्यामुळे महिला आयोगाने कारवाईचा इशारा दिला आहे. यावर बोलताना मी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळं महिला आयोग कारवाई करू शकत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली पाटलांनी दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.