Gautami Patil Dance Video : अवघ्या काही महिन्यांमध्येच सोशल मीडियामुळं प्रसिद्धीझोतात आलेलं गौतमी पाटील हे नाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे. एक रील व्हायरल होतो काय आणि गौतमी पाटीलचं नाव वाऱ्याच्या वेगानं प्रसिद्धीझोतात येतं काय.... आता पुन्हा एकदा गौतमीच्याच नावाची चर्चा सुरु झाली असून, यावेळी कार्यक्रमात झालेला गोंधळ किंवा व्यासपीठावर कुणी दौलत ज्यादा करण्याच्या करणानं तिचं नाव समोर आलेलं नाही.
यावेळी या सबसे कातिल गौतमी पाटीलनं कमालच केलीये बुवा. कारण, तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या गौतमीनं चक्क आता तगड्या बैलालाही खुळं केलं आहे. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा तिचा व्हिडीओ तुम्ही पाहिला नाही वाटतं?
मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा या कार्यक्रमात गौतमीनं नृत्य सादर केलं, त्या क्षणाचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं भल्यामोठ्या व्सपीठावर गौतमी आणि तिच्यामागं इतरही नृत्यांगना नाचताना दिसल्या. यावेळी त्यांनी 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'चंद्रा...' या उडत्या चालीच्या गाण्यावर ठेका धरला.
कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र हगवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एकेकाळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला'.
सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमासाठी चक्क बैल आणला होता. या बैलासमोरच गौतमी पाटीलनं नृत्य सादर केलं. तिचा हा आगळावेगळा प्रेक्षक पाहून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. बैलासमोर नृत्य सादर केल्याने गौतमी आणि त्या बैलाची भलतीच चर्चाही झाली.
गौतमीनं ज्या बैलासमोर नृत्य सादर केलं, त्याचं नाव बावऱ्या. एखाद्यानं त्याच्यासाठी, त्याच्यापुढं नाचण्याचीही पहिलीच वेळ असावी. तेव्हा त्यानंही गौतमीचं नृत्य शांतपणे पाहिलं. बैलगाडा शर्यतीचं प्रतीक म्हणूनही या बावऱ्या बैलाला येथे आणण्यात आलं होतं. या बैलानं आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. गावामध्ये सर्वांचा तो लाडका आहे. तसेच गावची शान असलेल्या या बैलाची नेहमीच चर्चा असते.