पुणे : बारामती तालुक्यातील मोढवे गावामध्ये दोन भावांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या मोटे वस्ती इथली ही घटना आहे. तायाप्पा सोमा मोटे, वय 60 असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
नेमकं काय प्रकरण-
मयत तायाप्पा सोमा मोटे यांनी त्यांच्या लहान भावाला शेतामध्ये अडवलं आणि रस्त्यात लाकडाचे ओंडके आडवे का टाकले आहेत? असं विचारलं. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं, दोघांची भांडणं सोडवण्यासाठी कोणी आलं नाही. तायाप्पांनी ओंडक्यांबाबत विचारल्यावर, रामा मोटेने त्यांना शिवीगाळ केली.
तु आता या रस्त्याने जायचं नाही तुला आता खल्लासच करतो, असं रामा मोटे म्हणाला. भांडणामध्ये दोघांना राग अनावर झाल्याने त्यांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये आरोपी रामा मोटे याने तायाप्पा मोटेंच्या डोक्यावर घाव घालत जाग्यावर संपवलं.
रामा मोटेच्या पायावर तायाप्पांनी घाव केला यामुळे त्याला बारामतीमधील खाजगी दवाखान्यामध्ये आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या भांडणामध्ये मृत पावलेल्या तायाप्पा मोटे यांची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा नोंदवला.