अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या जोडप्याला सात महिन्यांनी मुलगी असून आता तिच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरवलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 09:42 AM IST
अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दाम्पत्याला एक सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीन हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे.

लोहगावमधील संतनगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. स्वप्नील बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशय आला म्हणून पतीचा खून केल्याचे समोर आलं आहे. 

रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय 35, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रुपालीच्या हत्येप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय 32, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली आणि आशिष यांचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले होते. आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती. त्यांना एक सात महिन्याची मुलगी देखील आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिषला आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणे केले. आशिष पत्नी रुपालीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत होता. शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडणे करून रुपलीला शिवीगाळ केली. या दरम्यान आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. 

दरम्यान, शेजारच्यांनी आरडाओरडा ऐकून घराकडे धाव घेतली असता त्यांना रुपाली रक्ताच्या थारोळ्यात सापडली. शेजारच्यांनी तात्काळ रुपालीला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी आशिषला अटक केली आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.