पुण्यातील डॉक्टरची फसवणूक; एक फोन आला अन् 1 कोटी गमावून बसला

Pune Crime News: पुण्यात बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे. 

सागर आव्हाड | Updated: Mar 26, 2024, 12:08 PM IST
पुण्यातील डॉक्टरची फसवणूक; एक फोन आला अन् 1 कोटी गमावून बसला title=
Pune Crime news Doctor Scammed Of Over Rs One Crore Through Fake Courier

Pune Crime News: पुण्यातील बाणेर येथील एका डॉक्टरची तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर येतेय. भामट्यांनी डॉक्टरला सायबर क्राइमच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ,परदेशी चलन सापडल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी बाणेर परिसरातील एका डॉक्टरची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली.हा प्रकार शिवाजीनगर भागातील क्लिनिकमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीचा प्रकार घडल्यानंतर ५० वर्षीय डॉक्टरने २३ मार्च रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर चोरट्यांनी एक मार्च रोजी डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तुम्ही मुंबईहून तैवानला कुरिअरद्वारे पाठविलेले पार्सल कंपनीने परत पाठविले आहे. मुंबई विमानतळावर पार्सल जप्त केले आहे. त्यात पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, अमली पदार्थ मेफेड्रोन, परदेशी चलन आणि लॅपटॉप आहेत. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी कार्यालयात हजर व्हावे लागेल. बँक खात्याची पडताळणी होईपर्यंत तुमच्या बॅंकेतील रक्कम सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. 

चोरट्यांनी सांगितलेल्या सर्व माहिती ऐकून ते घाबरले. त्यांनी सायबर चोरट्यांवर विश्वास ठेवत डॉक्टरने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तब्बल एक कोटी एक लाख ३० हजार रुपये हस्तांतरित केले. परंतु चोरट्यांनी ही रक्कम परत दिली नाही. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेचच पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. पण सायबर चोरट्यांनी इतक्या मोठ्या रक्कमेवर डल्ला मारल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळं कोणत्याही अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास उचलू नका किंवा ओटीपी आल्यास तो शेअर करु नका, असं अवाहन पोलिसांनी केलं आहे.