LokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...'

LokSabha: शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाले आहेत. यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 11:55 AM IST
LokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...' title=

LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अद्यापही शेवटच्या टप्प्यातील चर्चा सुरु आहे. काही जागांवरुन दोघांमध्ये घोडे अडले आहेत. यादरम्यान रासपचे नेते महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाल्याने महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. भाजपने धोका दिल्याचा आरोप करणारे महादेव जानकर पुन्हा महायुतीत सामील झाले आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर महायुतीत परतल्याने महाविकास आघाडीला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. 

शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी आम्हाला माढ्याचा नव्याने विचार करावा लागेल असं म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी महादेव जानकरांबद्दल बोलताना सांगितलं की, "महादेव जानकरांना शरद पवारांनी जाहीरपणे सोबत आले तर माढ्यातून उमेदवारी देऊ असं सांगितलं होतं. पण त्यांनी आता वेगळा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आम्हाला माढ्यासंबंधी नव्याने विचार करावा लागेल".

तसंच दोन ते तीन जागांवरुन आमच्यात चर्चा सुरु असून सर्व प्रश्न सुटत आल्याचा दावा त्यांनी केला आहे. "आम्ही बरीच चर्चा केली असून सगळे प्रश्न सुटत आले आहेत. दोन-तीन जागांचा मुद्दा आहे. पण पुढील एक-दोन दिवसांत सर्व प्रश्न संपतील," असं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

वंचितशी आमची चर्चा सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं. "वंचित सोबत यावी यासाठी प्रयत्न करत आहोत. यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल," असं त्यांनी सांगितलं. "उदयनराजेंच्या आम्ही संपर्कात नाही. दिल्लीत ते तीन दिवस बसून राहिले, बऱ्याच प्रयत्नांनी भेट झाली असं ऐकलं आणि वाचलं, पण ते आमच्या संपर्कात नाहीत," असं त्यांनी स्पष्ट केलं.

"छत्रपती शाहू महाराजांना निव़डणुकीत उभं राहण्याची विनंती करण्यासाठी मी दोन-तीन वेळा कोल्हापुरात आलो होतो. शरद पवारांनीही त्यांच्याशी चर्चा केली. अखेर त्यांनी शरद पवारांच्या विनंतीला मान देत आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतला. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहतील असं दिसत आहे. शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान करवीरकर करतील असा विश्वास आहे," असं जयंत पाटील म्हणाले आहे.