चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishore Aware) यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी भरदिवसा तळेगाव (talegaon) नगर परिषदेच्या परिसरात किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पुणे (Pune News) जिल्ह्यासह मावळमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला राजकीय द्वेषातून ही हत्या झाल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता या हत्येचे कारण समोर आले आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) या प्रकरणातील मुख्य चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने यातील तिघांना अटक केल्यानंतर या हत्येचे कारण समोर आले आहे.
शुक्रवारी दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव नगर परिषदेच्या समोर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मावळमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर किशोर आवारे यांच्या हत्या करुन पळ काढणाऱ्या आरोपींचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आवारे यांच्या आईच्या तक्रारीवरुन राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
हत्येचे कारण आले समोर
तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी या हत्येची कबुली देत महत्त्वाची माहिती दिली आहे. गौरव खदळेनेच आपल्याला ही हत्या करण्यास सांगितल्याचे आरोपींनी सांगितले पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे.
तळेगाव पोलिसांनी पोलिसांनी याप्रकरणी गौरव खळदेला देखीस अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं होतं.
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी गौरवने किशोर आवारे यांची नगरपरिषद कार्यालयातच क्रूर पद्धतीने हत्या घडवून आणली आहे. गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुलीही आरोपींनी दिल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.
आवारेंनी कानाखाली का मारली?
माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. यावरुनच त्यांच्यात वाद झाला आणि आवारे यांनी सर्वांसमोर भानू खळदे यांना कानाखाली लगावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदे नी हत्येचा कट रचला.