सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बेकायदेशीर स्थलांतरावर आधारित नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट डंकी फार चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटासारखेच एक प्रकरण महाराष्ट्रातील पुण्यात समोर आले आहे. पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 604 पासपोर्ट काढल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी 29 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.
कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी 604 पासपोर्ट काढल्याचे समोर आलं आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने झोपडीच्या भाडे करारावर भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट जारी केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात घबराटीचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या पासपोर्ट विभागाचे कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
पुण्यातील झोपडपट्टीच्या पत्त्यांवर बनवलेले पासपोर्ट उघडकीस आल्यावर मुंबई पोलिसांनी सहा बांगलादेशींना अटक केली. पुण्यातील झोपडपट्टीच्या नावावर भाडे कराराद्वारे त्यांनी पासपोर्ट बनवल्याचे समोर आले आहे. झोपडपट्टीच्या मालकीच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याद्वारे बांगलादेशी नागरिकाने पासपोर्ट काढल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांनी येरवड्यातील यशवंत नगर येथील झोपडपट्टीतील घरांच्या नावावर नावावर भाड्याची कागदपत्रे केली होती. त्याआधारे त्यांना पासपोर्ट मिळाला.
सुमन तुजारे नावाच्या महिलेची ही झोपडी होती. सुमन तुजारे हयात नाहीत. मात्र या पुण्यातील महिलेच्या झोपडपट्टीसाठी बनावट करार करून बांगलादेशींनी पासपोर्टही बनवून घेतला. अरब देशांमध्ये जाऊन रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी भारतीय पासपोर्ट बनवला होता. मुंबई पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 29 बांगलादेशी घुसखोर आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन भारतीयांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून मुंबई पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत होतं. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 बांगलादेशींनी सुमन तुजारे नावाच्या मृत महिलेच्या नावाचा अॅग्रीमेंट करून पासपोर्ट तयार केले आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पासपोर्ट कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस जेव्हा मृत महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा सुमन तुजारे यांनी कोणालाही झोपडी भाड्याने दिली नसल्याचे उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशींनी तुजारे यांच्या नावाने बनावट भाडे करार करून पासपोर्ट कार्यालयात जमा केला. पोलिसांनीही त्याची पडताळणी केली आणि त्यानंतर बांगलादेशींना पासपोर्ट मिळाला.