Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Bopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2024, 11:32 AM IST
Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल title=
सोशल नेटवर्किंगवरुन साधला निशाणा

Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटात मागील आठवड्यात एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचं प्रकरण चर्चेत असतानाच आता यावरुन राजकीय टीका होताना दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: शरद पवार मंगळवारी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी हा दुर्देवी प्रकार घडला तिथे जाऊन पहाणी करुन आले. या ठिकाणी भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली. मात्र या पोस्टवरुन आता अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पहाणी

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटात जाऊन पोलिसांकडून नेमकं काय घडलं याची पहाणी केली. या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना सुप्रिया सुळेंनी, "बारामती लोकसभा मतदार संघातील बोपदेव घाटाला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काही दिवसापूर्वी या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले," अशी कॅप्शन दिली. 

रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना सवाल

सुप्रिया सुळेंनी केलेल्या या पोस्टला कोट करुन रिप्लाय करताना रुपाली चाकणकरांनी त्यांना सुनावलं आहे. "संबंधित घटना घडून पाच दिवस झाले. पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले. मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी?" असा सवाल रुपाली चाकणकरांनी उपस्थित केला आहे.

तुमच्या प्रदेश सरचिटणीसावर अश्लील व्हिडीओ बनविणे...

तसेच या पोस्टला रिप्लाय करताना रुपाली चाकणकरांनी, "आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक कांग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार?" असा सवाल रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे. "आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसावर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, ते व्हिडीओ पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी 4 सायबर गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी?" असा प्रश्न रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.

नक्की वाचा >> पंढरपूरला मुक्कामी जात असाल तर सावधान! फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड; भक्त निवासाच्या...

भानुदास मुरकूटेंचा उल्लेख

"कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला. जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत. यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार?" असा सवालही चाकणकरांनी विचारला आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, "झोपी गेलेल्याला जागं करता येतं. झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही म्हणून आपल्या माहितीसाठी एनसीआरबीचा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे," असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.


आता रुपाली चाकणकरांच्या या टीकेला शरद पवारांचा पक्ष काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.