दुसऱ्याला वाचवण्याच्या नादात चौघांना उडवले; पुण्यात भीषण उपघात CCTVत कैद

Pune Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने तीन महिलांना उडवल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 25, 2023, 10:30 AM IST
दुसऱ्याला वाचवण्याच्या नादात चौघांना उडवले; पुण्यात भीषण उपघात CCTVत कैद title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune Accident) हिंगणे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. हिंगणे चौकात झालेल्या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला चारचाकी गाडीने उडवले. पाचही जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विठ्ठलवाडीहून आनंद नगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ एका क्रेटा गाडीवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या तीन महिलांना उडवत गाडी पुढे उभी असलेली एक दुचाकी गाडीत अडकल्याने गाडी तेथेच थांबली. मात्र, या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांसह एक लहान मुलगा आणि एक पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जखमी झालेल्या महिला रिक्षाची वाट बघत रस्त्यावर उभ्या होता. त्यावेळी भरधाव क्रेटा गाडी आनंद नगरहून हिंगणे चौकात आली. त्यानंतर गाडी यु टर्न घेऊन पुन्हा आनंद नगरच्या दिशेने निघाली होती. या गाडीमध्ये एक दांपत्य त्यांच्या दोन-तीन महिन्याच्या बाळासह होते. आनंद नगरच्या चौकात असलेल्या बालरोग तज्ज्ञ मानकर रुग्णालयात त्यांना जायचे होते. बस थांब्याच्या अलीकडे एक दुचाकी उलट्या दिशेने येत होत्या. त्यावर दोन महिला बसल्या होत्या. उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला चुकवण्यासाठी चालकाने गाडी वळवली. मात्र, एक महिला मध्ये आल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच एक्सलेटर आणि ब्रेक यामध्ये चालकाचा पाय अडकला. त्यानंतर रिक्षाची वाट पाहत असलेल्या महिलांना गाडीने उडवले. सुदैवाने गाडीच्या पुढच्या भागात दुचाकी अडकल्याने गाडी तिथेच थांबली.

पुण्यात दुचाकीस्वाराला चिरडलं

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर भीषण अपघात झाला होता. इंदापूर येथे एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडलं. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दशरथ मारुती चोरमले असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो इंदापूरच्या काळके वस्ती गलांडवाडी नंबर एक येथील रहिवासी होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरिल दुर्गेश्वरी हॉटेल समोर हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने हा ट्रक पेटवून दिला आहे. हा ट्रक सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. या दरम्यान दुचाकीवरील दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन घरी निघाले असता त्यांना चिरडलं.