पुणे : पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले हे पहिले रुग्ण आहेत. दुबई प्रवास करून आल्यानंतर त्यांना लक्षणं आढळली होती.
त्याचप्रमाणे १० मार्चला दाखल २ रुग्णाचे पाहिले सँपल देखील निगेटिव्ह आले आहेत. आज त्यांचे सँपल पुन्हा तपासणी साठी पाठवण्यात येतील. ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनादेखील हॉस्पिटल मधून सोडण्यात येईल.
पुण्यात पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. त्यामुळे आता पुण्यातील सामान्य लोकांना पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध होणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल आणि डिझेल मिळेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यभरात कर्फ्यु लागू झाल्याची घोषणा केली होती. मात्र, यानंतरही नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. आज सकाळपासून राज्याच्या अनेक भागांमधील बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच मुंबई आणि पुण्यातील रस्त्यांवर अनेक वाहने दिसून आली.
या सर्वांना आवरताना पोलिसांना नाकीनऊ आले होते. मात्र, आता पुण्यात इंधनविक्रीच बंद झाल्याने विनाकारण रस्त्यावर गाड्या उडवत फिरणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.
कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर नागरिक बाजारपेठांमध्ये भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही.
राज्यात सध्या पुढील सहा महिने पुरेल इतका धान्यसाठा आहे. त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. काल पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून केलेल्या आवाहनानंतर देखील ही गर्दी पाहायला मिळाली.
त्यानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नसल्याचे सांगत जनतेला आश्वस्त केले.