Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुण्यात गुन्हेगारी घटनाही वाढत चालल्या आहेत. अशाच एका घटनेने पुणे हादरले आहेत. अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे. (Pune Live News Today)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय तरुणीला 15 दिवस डांबून ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले. 15 दिवस तरुणीला घरात डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेतला. इतक्यावरच न थांबवा आरोपींनी पुण्यातील 3 लॉजमध्ये पीडीतेला नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आले.
अल्पवयीन पीडित मुलीसोबत हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम माने (22) आणि आकाश माने (24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पूनम माने हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणीचे वडिल आजारी असताना त्यांनी फिर्यादी दाम्पत्याकडून उपचारासाठी ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता आले नाहीत. त्यामुळं उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी पीडित तरुणीला एका लॉजवर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं. या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीरविक्रीस भाग पाडले. पीडित अल्पवयीन तरुणीला वेशव्यवसायात ढकलून त्यामाध्यमातून आरोपींनी पैसे कमावले.
पोलिसांना काल पुण्यातील के. के मॉलजवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत पीडित तरुणीची सुटका केली. त्यानंतर तिची अधिक चौकशी केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे. तसंच, ज्या लॉजवर हे प्रकार घडले आहेत त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आकाशची पत्नी पूनम हिला अटक केली असून आकाश माने सध्या फरार आहे.