PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज वेगवेगळया विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी चार वाजता पंतप्रधान मोदींचं मुंबईत आगामन होणार असून यासाठी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो असलेले बॅनर्स शहरातील वेगवगेळ्या भागांमध्ये झळकत आहेत. असं असतानाच मुंबईतील (Mumbai News in Marathi) काही ठिकाणी शिंदे गट-भाजपाने लावलेल्या या बॅनर्सच्या बाजूलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी नतमस्तक झाल्याच्या जुन्या फोटोचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स नेमके कोणी लावले आहेत याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली नाही. यापैकी काही बॅनर्सवर, 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते' असं वाक्यही लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगांव, चर्नी रोड परिसरात बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे बॅनर (PM Modi - Balasaheb Thackeray Banner) लावण्यात आले आहेत. यामध्ये, 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...' असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. भाजपाला याद्वारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे पोस्टर अज्ञाताद्वारे लावण्यात आले असून यामागे नेमकं कोण आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. अनेक ठिकाणी भाजपा-शिंदे गटाच्या बॅनर्सच्या बाजूलाच मोदी बाळासाहेबांसमोर वाकून नमस्कार करत असल्याचा फोटो असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं मागील काही दिवसांमध्ये पहायला मिळालं होतं. शिवसेनेनं या दौऱ्याला प्रत्यक्षपणे विरोध केला नसला तरी खासदार संजय राऊतांनी या दौऱ्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक विधानं केली होती. फडणवीसांनी मोदींच्या दौऱ्यासाठी दावोसला न गेल्याबद्दल राऊतांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता या बॅनरवॉरच्या माध्यमातून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 38 हजार 800 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या हत्ये महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही केलं जाणार. वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये म्हणजेच बीकेसीमध्ये मोदींची सभा आणि रोड शो सुद्धा होणार आहे. मोदींच्या या सभेला गर्दी जमवण्याच्या उद्देशाने 250 हून अधिक एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस सुटणार आहेत. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली असून दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसला मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळालं आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या मुंबईत दौऱ्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा (Mumbai Police) फौजफाटा सज्ज आहे.