कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : नवरा बायको यांच्यात रुसवे फुगवे होतात आणि राग पुन्हा शांतही होतो. पण या नवऱ्याचा राग एवढा वाढला, एवढा संताप झाला की तो आयुष्यभरासाठी आता जेवणाची वेळ विसरणार आहे. त्याच्या हक्काचं जेवलात का विचारणारी जोडीदार आता त्याला पुन्हा विचारणार नाही. जेवायला उशीर झाला म्हणून नवरा एवढा संतापला आणि आयुष्यभर जेवणाची वेळ चुकवून बसला.
नवऱ्या डोक्यात राग इतका गेला की तो चक्क बायकोच्याच जीवावर उठला. पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. नेहरूनगरमध्ये बायकोनं जेवण तयार करायला उशीर केला म्हणून तिच्या जीवावर नवरा उठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
आरोपी बाबू उर्फ राहुल पारधे या तरुणाने क्रूरतेचा कळस गाठला. पत्नीला जेवण करण्यासाठी उशीर झाल्याने संतापलेल्या या नराधम पत्नीच्या अंगावर डिझेल टाकत तिला पेटवून दिल. या घटनेमध्ये पत्नी 32 टक्के भाजली आहे. जखमी पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी या घटनेनंतर लगेच बेड्या ठोकल्या त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली. सुदैवाने या घटनेत पीडित महिला ही बचावली आहे. पण गेल्या काही दिवसात क्षुल्लक कारणावरून हत्येसारख्या घटना घडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यातून विकृत मानसिकतेचं दर्शन अधिक होत आहे आणि हिच खरी चिंतेची बाब आहे.