Gunratna Sadavarte Controversy : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृतींसाठी प्रसिद्ध आहेत. गुणरत्न सदावर्ते आता पुन्हा एकदा त्यांच्या अशाच एका वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्यासोबत लावला आहे. सदावर्तेंनी चक्क नथुराम गोडसेच्या (nathuram godse) फोटोला पुष्पहार अर्पण केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या फोटोंसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो लावल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावून पुष्पहार अर्पण केला. नथुरामच्या फोटोला हार घालून त्यांनी अखंड भारताचा विजय असो अशी घोषणाबाजीही केली. ही स्टंटबाजी झाल्यानंतर सदावर्तेंनी नथुराम गोडसेचा फोटो लावण्याचं समर्थन केले.
नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता असं म्हणत मला मत मांडण्याचा अधिकार असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांची जी ट्रायल झाली होती त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. नथुराम पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायलचा समना केला. पण नथुराम यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही”, अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली. मी संविधानामध्ये PhD केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचण्यामध्ये सहभागी असलेल्यांना भारतरत्न का असा सवाल करत भारतरत्न द्यायचाच असेल तर नथुराम गोडसेलाही द्यावा, असं विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते.