सातारा : साताऱ्यात सर्पदंशाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खटाव तालुक्यातील अनफळे गावात ही घटना घडली आहे. मारुती आडके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सर्पदंश झाल्याने वृद्ध मारुती आडकेंना मायणी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र आरोग्य अधिकारीच उपलब्ध नव्हता. सुमारे तासभर डॉक्टरांची वाट पाहूनही रुग्णास उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णास साताऱ्यात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्यापूर्वीच वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता.
वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ग्रामस्थांनी मायणी येथील आरोग्य केंद्रासमोरच हा मृतदेह ठेवला होता. अखेर दोषींवर कारवाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसंच प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी विनित फाळके यांनी चौकशीचेही आदेश दिले आहेत.