अमर काणे, झी २४ तास, नागपूर : आर्थिक घोटाळ्यांचे (Financial Fraud) अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील पण कधी पेन्शन घोटाळा (Pension Scam) ऐकलाय का? पण नागपूर जिल्हा परिषदेत चक्क पेन्शन घोटाळा झालाय. मृत पेन्शनधारकांना चक्क जिवंत दाखवून त्यांचं पेन्शन लाटण्यात आलंय. एका महिला कनिष्ठ लिपिकानं (Junior Clerk) तिच्या परिचयाच्या व्यक्तींच्या नावानं बँक खातं (Bank Account) उघडलं, त्याद्वारे मृत व्यक्तींना जिवंत दाखवलं आणि मृत व्यक्तींची पेन्शन लाटली.
पारशिवानी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात (Education Department) हा पेन्शन घोटाळा झालाय. याप्रकरणात कनिष्ठ लिपीक म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर (Female Employee) निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. आता याप्रकरणी संबंधित शिक्षण विभाग, लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभाग अशा तीन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. तीन सदस्यीय चौकशी स्थापन करण्यात आलीय.
महिलेनं बँकेत खातं कुणाच्या नावानं उघडलं, त्यासाठी कोणती कागदपत्रं जमा केली, किती कालावधीपासून पेन्शन लाटण्याचा हा प्रकार सुरु होता याची आता चौकशी सुरु आहे. पेन्शनधारकांना ठराविक कालावधीनंतर आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. त्यासाठी कडक नियम असतात. तरीही मृत व्यक्तींच्या नावानं पेन्शन लाटली गेलीय, हा निश्चितपणे गंभीर प्रकार म्हणावा लागेल.