पालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...

नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे

Updated: Mar 2, 2023, 03:24 PM IST
पालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने  सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर... title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : इंटरनेटच्या (Internet) युगात पालक आणि पाल्यांमधला संवाद कमी होत चालला आहे. नोकरी करणारे आई-वडील आणि आभासी जगात वावरणारे विद्यार्थी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शालेय वयातच मुलांच्या हातात मोबाईल आल्यापासून मुलांचा खेळणं-बागडणं, आई-वडिलांबरोबरचं संभाषण कमी झालं आहे. त्यातच आई-वडिल नोकरीत व्यस्त आणि घरात आल्यावर उरलेला वेळ मोबाईलमध्ये घालवत असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. अशीच धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. (Less communication between parents and children)

आई-वडिल वेळ देत नाहीत
आई-वडील वेळ देत नाही म्हणून सातवीतल्या मुलीने तिच्या दोन मैत्रिणींसह घर सोडल्याची घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinangar) मध्ये घडली. या मुलीने वाढदिवसाच्या (Birthday) दिवशीच घर सोडलं. 500 रुपये घेऊन आपल्या दोन मैत्रिणीसह ती मनमाड पर्यंत गेली मात्र त्यानंतर तिथून परत आली.   पोलिसांनी या मुलींची चौकशी केली यावेळी मुलींनी दिलेलं उत्तर ऐकून पोलिसही सून्न झाले. आई-वडिल वेळ देत नाहीत म्हणून घर सोडल्याचं त्यांनी सांगितंल. पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन केलं.

पालक वाढदिवस विसरले
यातील एक मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. मात्र आई-वडील घरी नव्हते. त्यामुळे मुलीला वाईट वाटलं तिने घरातून पाचशे रुपये घेतले दोन मैत्रिणींना बोलवलं आणि  फिरून येऊ म्हणून तिन्ही मुली थेट रेल्वेत बसल्या. रेल्वेतून त्या मनमाड पर्यंत गेल्या मात्र तिथून त्या मुली पुन्हा संभाजीनगरला परतल्या आणि रिक्षा करून घराजवळ आल्या. या सगळ्या काळात मुली दिसत नाही म्हणून पालकांनी पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनीही मुलींचे अपहरण झालं की काय या भीतीने जंग जंग पछाडायला सुरुवात केली शोधाशोध सुरू केली. मात्र मुली घराजवळच दिसल्या नंतर पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.

आई-वडिल शिक्षक
छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणारी तेरा वर्षांची मुलीग सातवी इयत्तेत शिकते. मुलीचे आई-वडिल दोघंही एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. मंगळवारी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता, पण आई-वडिलांना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे मुलगी नाराज होती. आई-वडील वेळ देत नाही, कधी बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत, त्यामुळे आपल्या आई-वडिलांबरोबर राहण्याचा मुलीला कंटाळा आला होता.