अश्विनी बिद्रे प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, नार्को टेस्टची मागणी

या प्रकरणात दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. 

Updated: Dec 15, 2017, 09:11 PM IST
अश्विनी बिद्रे प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, नार्को टेस्टची मागणी title=

नवी मुंबई : बेपत्ता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणी अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील यांची पोलीस कोठडी १९ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. 

मोबाईल लोकेशन एकच

अश्विनी बिद्रे बेपत्ता होण्याआधी अभय कुरुंदकर, राजू पाटील आणि अश्विनी बिद्रे यांचं मोबाईल लोकेशन एकच होतं. त्यामुळे अश्विनी बिद्रेचा घातपात झाला असल्याची दाट शक्यता पोलिसांनी न्यायालयात वर्तवली. याबाबत या दोघांकडे चौकशी केली असता, आठवत नाही एवढंच उत्तर दोघे देत असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. 

अभय कुरुंदकरला प्रेमपत्र

दरम्यान १६ एप्रिल २०१४ ला अश्विनी बिद्रेनं अभय कुरुंदकरला प्रेमपत्र लिहिलं होतं. माझे हातपाय तोडून मला मारावं अशी तुझी इच्छा आहे ती पूर्ण  होवो, असं  या पत्रात अश्विनीनं शेवटी लिहिलं होतं. तिचं हे पत्रही पोलिसांनी न्यायालयात सादर केलं. तसंच अभय कुरुंदकरच्या भाईंदरमधल्या घराच्या झडतीत, पोलिसांना टॉवेलवर रक्ताचे डाग आणि केस सापडले आहेत. त्याचं केमिकल अनॅलिसिस केलं जाणार आहे. यासाठी अश्विनीच्या मुलीच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. 

नार्को टेस्टची मागणी

अश्विनी बिद्रे हिचे पती राजू गोरे यांनी अभय कुरुंदकरच्या नार्को टेस्टची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्याशी बातचित केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.