'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ नका असे सांगितलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 10, 2023, 09:21 AM IST
'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद  title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Parikrama Yatra) सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढत विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देत आहेत. शनिवारी रात्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमधील (Beed) पाटोदा येथे पोहोचली आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत तुमचा तोल जाऊ देऊ नका असा सल्ला दिला आहे.

रात्री उशिरा पंकजा मुंडे या शिवशक्ती यात्रा घेऊन गोपीनाथ गडावरती दाखल झाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.  यावेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी मी घरी बसले नव्हते. तर, गढूळ परिस्थितीला वैतागले होते असे कार्यकर्त्यांना सांगितले.

"अनेक वेळा मला नाकारलं गेलं. तरी देखील मी माझा तोल घसरू दिला नाही. सध्या वातावरण गढूळ आहे त्यात मला तुरटीचे काम करायचे आहे. याला हाणून पाडण्याचा डाव ही अनेकांचा असेल. कुणीतरी एखादा बॅनर लावेल आणि या यात्रेला बदनाम करण्याचं काम करतील. पण डोक्यावर बर्फ ठेवा. अनेक वेळा मला नाकारलं तरी मी माझा तोच जाऊ दिला नाही तुम्ही देखील आपला तोल जाऊ देऊ नका," असं म्हणत कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी भावनिक साद घातली.

माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही - पंकजा मुंडे

मी घरी बसले नव्हते. गढूळ परिस्थितीला वैतागले होते. काही बोलायलं गेलं, तर दुसरंच चालवलं जायचं. माझ्या मागे बरेच प्रश्न होते. ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अडचणी आणि बरेच प्रश्न आहेत. जमेल तसे तेही प्रश्न सोडवू. पंकजा मुंडे राजकारणात काय करेन, काय नाही करेन. पण, कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही. मी रणांगणात उतरले आहे. हे रन रखरखतं आहे. काहीजण मला अहंकारी म्हणतात. मात्र, माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य देखील नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.