...म्हणून पंकजा मुंडेंनी आपल्या नावासमोरून 'चौकीदार' हटवलं!

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  इथं आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रासाठी त्या उपस्थित झाल्या होत्या.

Updated: Mar 20, 2019, 03:24 PM IST
...म्हणून पंकजा मुंडेंनी आपल्या नावासमोरून 'चौकीदार' हटवलं! title=

संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : देशातून आणि राज्यातून मोदींच्या 'मैं भी चौकीदार' ही मोहीम मोठी चर्चेत आलेली पाहायला मिळतेय. या मोहिमेचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या नावासमोर 'चौकीदार' असा शब्द जोडल्याचं पाहायला मिळतंय. परंतु राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या नावापुढे मात्र सोशल मीडियावर 'चौकीदार' हा शब्द लावलेला दिसत नाही. 'असं का?' असा प्रश्न त्यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला तेव्हा 'मीदेखील माझ्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला होता. परंतु सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यानं मी तो शब्द वगळला. मी सोशल मीडियावर काय करतेय, हे पाहण्यासाठी काही लोकांची सक्रिय टोळी आहे. माझ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेला गालबोट लागू नये, यासाठी मी माझ्या नावापुढील चौकीदार हा शब्द वगळला' असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  इथं आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रासाठी त्या उपस्थित झाल्या होत्या. या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांपैकी काही नेतेमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. तुमच्या नावापुढे 'चौकीदार' हा शब्द का जोडलेला नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या 'या मागे काही कारण नाही. अशी जेव्हा संकल्पना सुरु झाली तेव्हा माझ्या सोशल मी़डिया टीमने माझ्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला होता. पण यानंतर मी ट्रोल होऊ लागले. माझ्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे माझ्यामुळे या संकल्पनेला काही त्रास होऊ नये, यासाठी हा शब्द वगळला गेला. सोशल मीडियावरील माझ्या हालचालींवर मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देण्यासाठी एक वर्ग सक्रिय आहे. जेव्हा आपण एक प्रमुख नेते आणि मंत्री आहे म्हटल्यावर आपल्यावर इतरांनी लक्ष देणे हे साहजिकच आहे. त्यामुळे माझ्यामुळे मोदीजींच्या या मोहिमेवर काहीही परिणाम होऊ नये यासाठी मी 'चौकीदार' हा शब्द वगळला. मी एखादी गोष्ट म्हटली आणि ती गोष्ट १०० पैंकी १० जणांना जरी पटली नाही, तरी याचा मोदींच्या मोहिमेवर नकारात्मक परिणाम  होऊ नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला', असं स्पष्टीकरण यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलंय.

आपल्या 'चौकीदार' प्रतिमेला देशभरातील नागरिकांसमोर आण्ण्यासाठी आणि यासोबत लोकांना जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या नावाच्या पुढे 'चौकीदार' हा शब्द जोडला. यानंतर मोदींच्या या मोहिमेला त्यांच्या मंत्रिमंडळानी पाठिंबा देत त्यांनी देखील आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. या संपूर्ण प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा झाली. त्यावरून विरोधकांनीदेखील 'चौकीदार चोर है' ही घोषणा वापरली. सोशल मीडियाच्या वापराबद्दल बोलताना 'मी सोशल मीडियावर नसते. दिवसातून मी फक्त १० मिनिटं सोशल मीडिया पाहते. सोशल मीडियाचा हल्ली दुरुपयोग केला जात आहे. सोशल मीडियावर आपली प्रतिमा उंचावताना याचा इतर कोणाला फटका बसणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.  महिलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली पाहिजे... प्रत्येकाने व्यक्त व्हायला हवं पण विषयावर किंवा विचारांवर... पण हल्ली सर्रास 'व्यक्तीटीका' होताना पाहायला मिळत आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.