Ajit Pawar On Operation Lotus: महाराष्ट्रासह देशभरातील कोणत्याही राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी 'ऑपरेशन कमळ' राबवले जाते,असा आरोप विरोधक करत असतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडून महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. आमच्यामागे महाशक्तीचा हात असल्याचे त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. पण ही महाशक्ती कोण आहे? हे कोणी स्पष्टपणे सांगत नव्हते. दरम्यान, अजित पवार हे देखील सत्तेत सहभागी झाले. हे घडताना पडद्यामागे अनेक गोष्टी घडत होत्या. दिल्लीत अमित शाहांसोबत बैठकी होत होत्या. यासाठी 'ऑपरेशन कमळ' राबवले गेले,अशी त्यावेळी चर्चा झाली. पण आता त्यामागची कहाणी खुद्द अजित पवार यांनीच सांगितली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमोकळ्या गप्पांमध्ये सत्तेत जाण्यापुर्वी आपण कसे व्यवस्थापन केले याबद्दल अनेक रोचक गोष्टी सांगितल्या.
अजित पवारांनी अनौपचारीक गप्पा मारताना ऑपरेशन कमळची कहाणी पत्रकारांना सांगितली. राजधानी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते.राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीत बैठका झाल्या. अमित शहा यांच्या घरी या बैठका झाल्याचे अजित पवारांनी सांगितले.
याआधी देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेंची भेट घ्यायचे, ही माहिती समोर आली होती. दरम्यान आता अजित पवारदेखील वेश बदलून जायचे अशी माहिती समोर आली आहे. अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकांना मास्क आणि टोपी लावून उपस्थित राहायचो असे अजित पवारांनी सांगितलं.
विमानाचं तिकिट अजित अनंतराव पवार ऐवजी ए. ए. पवार नावाने काढलं जायचं.सर्व सहकारी आमदारांशी सल्लामसलत करून मी हे पाऊल उचलंल्याचे अजित पवारांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदा गप्पा रंगल्या. भाजपसोबत सत्तेत जावं हे सर्व आमदारांचंच हे म्हणणं होतं मात्र काही आमदार आले नाहीत,असेही ते पुढे म्हणाले.
महायुतीचा जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. प्रत्येक जागांबाबत लवकरच चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशातून धडा घेत एकत्रित निवडणूका लढवणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुलींसाठी आणि महिलांसाठी योजना आणल्याचं समाधान असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी फी माफीच्या घेतलेल्या निर्णयामुळं भविष्यात प्रत्येक क्षेत्रात महिलांचं प्रमाण वाढणार आहे.सत्तेत सहभागी झाल्यामुळंच मी हे करू शकलो, असेही ते यावेळी म्हणाले.