पुणे : कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचं लक्षात येत आहे. सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय राबवूनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही आव्हानं येत आहेत. याच आव्हानांवर मात करत राज्य सरकारकडून नागरिकांनाच स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
पुण्याच हा रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. संबंधित रुग्णाने फ्रान्स आणि नेदरलँड्स येथे प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आढळलेल्या या नव्या रुग्णामुळे आता येथील एकूण रुग्णसंख्या १८वर पोहोचली आहे. तर, राज्याच हा आकडा ४२वर गेला आहे.
#Corona : क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय?
गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये आढळणारे कोरोनाचे रुग्ण पाहता, प्रशासनाकडून पुणेकरांनी शक्यतो गरज नसल्यास प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुणेकरांनीही जबाबदारीने दुकानं बंद करत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला सर्वतोपरिने प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोनाची लागण रोखण्यासाठीचे उपाय केले जात आहेत.