Maharashtra Politics : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालीये.. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गुडघ्याला बाशींग बांधलंय.. जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच मविआत दक्षिण सोलापूरच्या जागेवरून कुरुबुरू पाहायला मिळतेय.. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय.. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची मशाल विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलंय..
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले.. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली होती..
संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील यांचे पूत्र अमर पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत.. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काय करायचा असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित केलाय. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून 19 जणांनी निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं पक्षाला कळवलंय. मविआच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात सुद्धा सांगली पॅटर्न होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला.. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2003 साली दक्षिण सोलापूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं.. त्यावेळी शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले होते.. हे विशेष.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची 20 सप्टेंबरला बैठक होणारे...त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय..जागा वाटपाचं सूत्रही त्याच बैठकीत ठरवलं जाणार असल्याची माहिती समोर येतेय...2019च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिंकलेल्या जागांसंबंधीत घटक पक्षाला जागा दिल्या जातील अशीही माहिती समोर येतेय...तर दुस-या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदार संघात जो पक्ष आघाडीवर होता ती जागा संबंधित पक्षाला दिली जाईल अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...