Maharashtra Weather Alert: सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंतच पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. तर, ऑक्टोबर महिन्याच्या 3 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हिटला सुरूवात होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार असून राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरुवात होणार आहे. तापमान वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
एल निनोमुळं यंदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. एल निनो 2024 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, या वर्षी डिसेंबरच्या आसपास तापमानाचा उच्चांक अपेक्षित आहे, असं हवामान विभागाकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये हवेतील आद्रता जास्त असेल. तसंच, दिवसा तापमान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परतीच्या पावसाच्यावेळी आर्द्रतेसह, तापमान वाढू शकते. हवामानातील हे बदल आरोग्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असतात. कारण नंतरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागलो, असं हवामानतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोर धरला आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच मान्सूनच्या पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.