औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
रोहित पवारांनी मतदारांना लाच देणे, प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आणि या सर्वांचा आधार घेऊन निवडणुकीत विजय मिळवला, असे आरोप राम शिंदे यांनी केलेत.
त्याचबरोबर बारामती ऍग्रो लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी जामखेड कर्जत मतदारसंघात आणलं होतं. हे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना प्रभावित करायचे, असे आरोप करण्यात आलेत. तसंच रोहित पवार यांनी निवडणूक खर्च दडपून ठेवला असाही आरोप करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजप उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता.