महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

 रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर आहे. येथे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती पहायला मिळते. 

Updated: Mar 8, 2024, 10:04 PM IST
  महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर title=

Shiva Temple In Raigad : नंदीचे दर्शन घेवून शिव मंदिरात दर्शनासाठी जावे लागते. सर्व शिव मंदिराबाहेर नंदीची मूर्ती दिसतेच.  रायगड जिल्ह्यात अनोखे शिव मंदिर आहे जिथे बसलेला नव्हे तर उभा नंदी आढळतो. महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव  मंदिर आहे जिथे उभा नंदी आहे. महाशिवरात्री निमित्ताने या मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली. 

देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ग्रामीण भागातील उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव इथं टेकडीवरती असलेल्या श्री देव वरदेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळाली. मंदिरातील शिवलिंग भोवती फुलांसह विविध फळांनी केलेली सजावट आकर्षक ठरली होती. द्राक्षे, केळी तसेच अन्य फळांनी गाभारा परिसर सुशोभित करण्यात आला होता मुख्य आकर्षण होते ते उभा नंदी. शंकराच्या मंदिरात सर्वच ठिकाणी नंदी बसलेल्या अवस्थेत आढळून येतो मात्र गोरेगावातील या एकमेव मंदिरात नंदी उभा पहायला मिळतो संपूर्ण देशातील हे एकमेव ठिकाण असल्याचं सांगितलं जातं.

15 व्या शतकातील चंद्रपूरचे अंचलेश्वर मंदिर 

चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं पंधराव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशा यानं आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले. तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळंच इथं भव्य मंदिराची उभारणी झाली. चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळं ब-याच अंशी ढासळले होतं. पण आता त्याच्या डागडुजीचं पुरातत्व विभागानं हाती घेतलेले काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं येणा-या पिढ्यांनासुद्धा मंदिर महात्म्य कळू शकणार आहे.