कर्ज न फेडू शकणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून काँग्रेस संरक्षण देईल- राहुल गांधी

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी शेतकऱ्यांना, तरुणांना मोठे स्वप्न दाखविले होते.

Updated: Apr 26, 2019, 11:00 PM IST
कर्ज न फेडू शकणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून काँग्रेस संरक्षण देईल- राहुल गांधी title=

अहमदनगर: भारतीय बँकांकडून कर्ज घेऊन फरार झालेले मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे सर्व उद्योगपती बाहेर आहेत. याउलट एखाद्या शेतकऱ्याने साधे २० हजार रुपयांचे कर्ज थकवले तरी त्याला तुरुंगात जावे लागते. मात्र, काँग्रेसची सत्ता आल्यास कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून संरक्षण मिळेल, एकही शेतकरी आतमध्ये जाणार नाही. त्यासाठी आमचे सरकार कायदा करेल, अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. ते शुक्रवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेर येथे घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते. 

यावेळी राहुल गांधी यांनी फसव्या आश्वासनांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना, तरुणांना मोठे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही. केवळ फसवणूक केली. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर 'न्याय' योजना, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणि तरुणांच्या रोजगाराचे आश्वासन पूर्ण करू. त्यामुळे आता तुम्हाला खऱ्या आणि खोट्यामधून योग्य निवड करायची असल्याचे राहुल यांनी सांगितले. 

तसेच आम्ही शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडू. या अर्थसंकल्पामुळे आगामी वर्षात हमीभाव काय असेल, बोनस आणि नुकसान भरपाई किती मिळणार, सरकार अन्नप्रक्रिया प्रकल्प कुठे सुरु करणार, अशा प्रत्येक गोष्टीचा तपशील असेल. आम्ही मोदी सरकारसारखे दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देणार नाही. मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २२ लाख रिक्त सरकारी पदे भरली जातील. दहा लाख तरुणांना पंचायतीमध्ये नोकऱ्या मिळतील, असे आश्वासनही राहुल यांनी दिले. 

राहुल गांधी यांना आजच्या सभेला येण्यासाठी उशीर झाला. प्रचारासाठी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार रात्री दहापर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना शेवटच्या टप्प्यात भाषण आटोपते घ्यावे लागले.