पुणे : मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही, असे मत एमपीएससी (MPSC )देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, त्यातून विद्यार्थ्यांच मोठे नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे यांनी साधला त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे. एमपीएससीची सर्व परीक्षा केंद्र ११ ऑक्टोबरला बंद करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. नवी मुंबईत मराठा आरक्षण बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षांबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया वक्त करताना परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
तर आरक्षणाच्या मागणीसाठी एमपीएससीची परीक्षा रोखणं चुकीचं आहे एमपीएससीची परीक्षा घेतलीच पाहिजे अशी भूमिका ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
तसेच विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरु असताना त्यावर सायबर हल्ला झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे. तर विद्यापीठांनी परीक्षांसाठी पुरेशी तयारी केली नसल्याचा आरोप सरकारने केला आहे. पण या घोळात एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे.