सिंधुदुर्ग/रत्नागिरी : काँग्रेसमध्ये घुसमट होत असलेले आणि भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असलेले नेते नारायण राणे यांनी शिवसेनेने मला ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. मात्र, शिवसेनेने अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केलेय.
नारायण राणे भाजपमध्येच जाणार, अशी चर्चा आहे. राणेंची बार्गेनिंग पॉवर संपलीय. शिवसेनेकडून राणेंना कधीही ऑफर नव्हती. पक्ष बदलताना, असे दावे करण्याची राणेंना सवय आहे, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी हाणला.
तर दुसरीकडे नारायण राणे यांची परिस्थिती म्हणजे ना घर का, ना घाट का अशीच झालेय. राणे स्वत:च शिवसेनेकडे नाक घासून येत होते. पण कोणत्याही परिस्थितीत नारायण राणे यांना शिवसेनेत प्रवेश नाही, असे विनायक राऊत म्हणालेत. त्यामुळे राणे यांचा दावा खोटा असल्याचा दावा त्यांनी केलाय.
दरम्यान, राणे पुत्र नीलेश यांना जोरदार टोला खासदार राऊत यांनी हाणला, 'नीलेश राणे केसही वाढवा, बुवाबाजीसाठी उपयोग होईल' माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय. काल सभेत नीलेश यांनी सेनेचा पराभव होत नाही, तोपर्यंत दाडी करणार नाही, असा निश्चय केला होता.
दरम्यान, नीलेश राणेंचा अडीच लाख मतांनी पराभव करणार असे उत्तर खासदार राऊत यांनी दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.