मुंबई : राज्यात आता 144 कलम लागू केले जाणार आहे. यामुळे सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी असेल. म्हणजेच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे.
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे यासारखी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. तसेच ज्या ठिकाणी दिवसा सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
आवश्यक सेवेतील दुकानं सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महाराष्ट्रात आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंत्री नवाब मलिक म्हणाले की, सोमवारी सायंकाळी आठ ते सोमवारी सकाळी सात या वेळेत महाराष्ट्रात शनिवार व रविवार लॉकडाऊन होईल. बस, गाड्या, टॅक्सी यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना आणि वाहतुकीस परवानगी असेल. रविवारी रात्री आठपासून एसओपी सुरू होईल. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. खाजगी वाहनांमध्ये ५० टक्के बसण्याची क्षमता देण्यात येईल.
मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी सांगितले की, रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावला जाईल. केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल. रेस्टॉरंटमधून केवळ कॅरी आणि पार्सल सेवांना परवानगी असेल. कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम देण्यासाठी सूचना केल्या आहेत.