Sachin Waze प्रकरणातील NIA तपास कुठवर आला? कोण-कोणते पुरावे मिळाले?

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यातच आता परमबीर सिंह यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Updated: Mar 17, 2021, 05:55 PM IST
Sachin Waze प्रकरणातील NIA तपास कुठवर आला? कोण-कोणते पुरावे मिळाले? title=

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यातच आता परमबीर सिंह यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मात्र या सगळ्यात आता केंद्रस्थानी आलेले सचिन वाझे यांची चौकशी कुठपर्यंत आली आहे, ते जाणून घेऊयात.

सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी सुरू आहे. २५ मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या सगळ्यात NIA चं पथक वाझे यांच्या ठाण्यातील घरी पोहोचलेली आहे. ठाण्यातील साकेत इमारतीत वाझे राहत आहेत. NIA ला संशय आहे की वाझे यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून काही कामं केलेली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ सापडलेली होती, त्याची नंबर प्लेट ही एका मर्सिडीज कारची असलेली कळतंय. ही गाडी NIA ला मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयाजवळील पार्किंगमध्ये मिळालेली. या गाडीतून पोलिसांना ५ लाख ७५ हजार रक्कम आणि पेट्रोल-डिझेल हस्तगत करण्यात आलेलं आहे.

त्यामुळे आता या केसमध्ये ३ कारचा समावेश झालेला आहे. एक स्कॉर्पिओ जी अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार होती, दुसरी मर्सिडीज आणि तिसरी आहे इनोव्हा, जी स्कॉर्पिओच्या मागेच होती.

NIA ला कोणकोणते पुरावे मिळाले आहेत?

सूत्रांच्या माहितीनुसार या तिन्ही गाड्यांच्या माध्यमातून NIA ला अनेक पुरावे मिळाले आहेत. २५ फेब्रुवारीला सीसीटीव्हीमध्ये जी व्यक्ती पीपीई कीटमध्ये आढळली, ती सचिन वाझेच असल्याचं बोललं जात आहे. तसंच तो पीपीई कीटही नसून एक ढगळा कुरता असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र या दोन्ही गोष्टी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत.

वाझे यांच्या केबिनमधून एक लॅपटॉपही मिळालेला, मात्र त्यातला डेटा हा डिलीट करण्यात आलेला. जेव्हा  NIA च्या पथकाने वाझे यांच्याकडे त्यांचा फोन मागितला, तेव्हा तो फोन कुठेतरी पडला, असं वाझेंनी उत्तर दिलं.