औरंगाबाद : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्री मोदींना देशातील लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवला. तरी सुद्धा रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे.
त्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने वैद्यकीय अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता किराणा दुकाने, दूध, भाजी विक्रीवर देखील बंदी लादण्यात आली आहे. शहरात सम तारखेस किराणा आणि इतर वस्तुंची दुकानं सुरू असून विषम तारखेस सर्व दुकानं बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.
परंतु आता १५ ते १७ मेदरम्यान औरंगाबाद शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. १७ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. दरम्यान, इतर अत्यावश्यक सेवांसाठी दिलेले पासही या तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.
गेल्या सात दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये ३७१ रुग्ण वाढले आहेत शिवाय २ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इतर सर्व सेवा बंद असल्यातरी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.