देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्युत्तर

विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. या सत्ताधारी पक्षातूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  

Updated: Sep 3, 2020, 07:23 AM IST
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्युत्तर  title=
संग्रहित छाया

बारामती, पुणे : विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. या सत्ताधारी पक्षातूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. बदल्यांमध्ये बिझी असल्याची टीका करणाऱे फडणवीस राज्य अडचणीत असताना बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्यांनी पंतप्रधान कुठे आहेत, याचे उत्तर द्यावे, असा टोला त्यांनी दरेकरांना लगावला आहे.

 बाळासाहेब थोरातांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

दरम्यान, शिवसेनेकडूनही विरोधकांचा समाचार घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना आणि विदर्भात महापुराने हाहाकार उडवून दिला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र परिवहनमंत्री अनिल परब यांनी विरोधकांचे हे आरोप खोडून काढले. मुख्यमंत्री घरात बसून आहेत, हे कुणी सांगितलं? दिवसभर ते 'वर्षा'वर बसून शासकीय बैठका घेतात, असे परब यांनी सांगितले.

राज्यात अनेक संकटे आहेत. पण, मुंबईतून खंबीर नेतृत्व करून सर्व संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामना करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर न पडता परिस्थिती हाताळतायत हे म्हणणे चुकीचे असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर शिवसेनेनं जनतेच्या मागणीनुसार नाणार प्रकल्प रद्द केलाय, असंही राऊत यावेळी म्हणाले.