मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे असले तरी रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती आहे, असे ते म्हणाले. मात्र, जेव्हा या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली.
नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ही भेट काही तास झाली. त्यानंतरही नाना पटोले यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हाती असल्याचा आरोप पाटोले यांनी गुरुवारी केला. (NCP President sharad pawar has remote control of mahavikas aghadi government says maharashtra congress president nana patole)
महागाईविरोधात काँग्रेसने राज्यात आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा कंट्रोल हा शरद पवार यांच्या हाती असल्याचे म्हटले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सरकार सुरू आहे, असेही ते म्हणाले.
एवढेच नव्हे तर 2014च्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत काँग्रेस नेत्याने राष्ट्रवादीवर फसवणूक केल्याचा आरोपही केला. पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची संख्याबळ वाढवण्याचा दावा केला आणि पुढच्या विधानसभा निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याविषयीही विधान केले. काँग्रेसचे मोठे नेतेही पुढची निवडणूक स्वतंत्र लढविण्याच्या बाजूने आहेत, असा दावा पटोले यांनी केला. आता महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गतवादानंतर पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनीही आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
नाना पटोले यांनी स्वत:च्या सरकारसंदर्भात वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी हे मोठे वादग्रस्त वक्तव्य केले. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे गृहमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. मात्र, या विधानानंतर वाद वाढल्यानंतर भाजपचे सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी पुण्यात काँग्रेसचे पालकमंत्री हवे होते, असे बोलून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना नाराज केले होते. याशिवाय, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली. तसेच बिब बी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर करुन पटोले हे चर्चेत राहिले आहे.