NCP मध्ये मोठ्या हालचाली! पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक, प्रफुल्ल पटेलांची घेतली भेट

Parth Pawar Rajya Sabha:  प्रफुल्ल पटेल यांनी सोडलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 11, 2024, 08:08 PM IST
NCP मध्ये मोठ्या हालचाली! पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक, प्रफुल्ल पटेलांची घेतली भेट title=
Parth Pawar Rajyasabha

Parth Pawar Rajya Sabha: पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी सोडलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, राज्यसभेसाठी लॉबिंग करणाऱ्या इतर दावेदारांमध्ये छगन भुजबळ, बाबा सिद्दिकी आणि आनंद परांजपे यांचा समावेश आहे. या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

कोण आहेत पार्थ पवार?

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत. 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. बारणेंनी तब्बल 2 लाख 5 हजार मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव केला. त्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ते आपली आई सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसले होते. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत होती. पण यावेळीदेखील सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी दारुण पराभव केला. अजित पवारांसाठी हा दुसरा कौटुंबिक धक्का होता.

दरम्यान राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर पार्थ पवार हे चर्चेत आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यावर टिका केली होती. पार्थ पवार अतिशय महत्वाचे नेते...केवळ वाय प्लसचं का? आणखी मोठी सुरक्षा त्यांना द्यायला हवी.