Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murdr) प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाष्य केलं आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यावरही ते स्पष्टपणे बोलले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शासकीय कामकाजासंदर्भात मी बावनकुळेंची भेट घेतली. महसूल विभागाचे बीज आणि परळी मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमची भेट झाली अशी माहिती त्यांनी दिली.
बीडमध्ये एक पलंग गायब झाल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलं आहे. या खाटा आधीच मागवल्या होत्या. घटना घडल्यानंतर किंवा आरोपी अटक होणार तेव्हा मागवलेल्या नाहीत. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे".
राजीनामा देण्याच्या मागणीसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. मी ना आरोपी आहे किंवा माझा काही संबध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा यापद्धतीने मागणी केली जात आहे".
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं खळबळजनक विधान केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, "वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. छोटा आका, मोठा आका अशी भाषा पहिल्यांदाच मी ऐकत आहे. एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी अतिशय व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणं हा आमचा पहिला उद्धेश आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही".
'मुळात या प्रकरणी ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी सर्वात आधी अधिवेशनात केली होती. त्यामुळे लगेचच चार्जशीट दाखल करुन, अटक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये मारेकऱ्यांना हत्येची शिक्षा मिळावी," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात काही चर्चा केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुमचा मंत्री म्हणून तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने राजीनामा घ्यावा या विरोधकांच्या मागणीसंदर्भात ते म्हणाले की, "म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिला आहे. हा तपास न्यायालयीनही होणार आहे. मंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडू शकत नाही म्हणूनच सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन तिन्ही चौकशी सुरु आहेत. मीच पालकमंत्री, मंत्री नसावं याचा विरोध करणाऱ्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल".
सर्वपक्षीय आमदारांनी एकवटणं एका निर्घृण हत्येविरोधात आहे. त्यामुळे त्यात चुकीचं नाही. ती घटना अतिशय दर्दवी आहे, जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशी आपली भूमिका स्पष्ट केली. जे निर्णय अजित पवार घेतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले.