शिवसेनेनं निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची भूमिका पूर्वीसारखी नसेल- अजित पवार

 शिवसेनेनं काही निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची भूमिका पूर्वीसारखी नसेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. 

Updated: May 31, 2018, 07:21 PM IST
शिवसेनेनं निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची भूमिका पूर्वीसारखी नसेल- अजित पवार title=

मुंबई : पालघरमध्ये समविचारी एकत्र आले असते तर तिथला निकाल कदाचित वेगळा दिसला असता असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केले आहे.  भाजप शिवसेना वेगळे लढले तर भाजपला विरोधात बसावं लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  शिवसेनेनं काही निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची भूमिका पूर्वीसारखी नसेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. पालघरमध्ये कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी, शिवसेना, माकप अशा सगळ्यांनी उमेदवार दिले. भंडारा- गोंदियात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, नाना पटोले यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने हा विजय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या विजयाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेना विचार करून निर्णय घेईल.
 
पालघरमध्ये जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, ते आम्ही करू.

भंडारा गोंदीयातील विजयानं हुरळुन जाण्याचं कारण नाही . आघाडी करताना काँग्रेस-राष्ट्रवादीने तुटे पर्यंत ताणायला नको . जागा वाटपात दोन पावलं मागे पुढे होण्याची तयारी ठेवावी लागेल . आम्ही सगळे जुळी भावंडं आहोत, कुणी लहान मोठा नाही 

एकदा पवार साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर ती सगळ्यांना मान्य असेल

मुख्यमंत्र्यानी बारामतीत आश्वासन दिलं होतं. आतापर्यंत दीडशे कॅबिनेट झाल्या पण धनगर आरक्षण दिलं नाही 

तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही, लोकांची फसवणूक करणार मग कार्यक्रमामध्ये गोंधळ होणारच
 
२०१९ ला आम्ही भाजप आणि शिवसेना यांच्या एकत्रित युतीला सामोरं जाण्याच्या द्रुष्टीनं तयारी करत आहोत. भाजपचे केंद्रातील सगळे नेते सांगत आहेत की शिवसेनेबरोबर युती करणार 
 
भाजपचे नेते परिस्थीती  पाहून निर्णय घेतात. शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद द्यायलाही तयार होतील. अगदी पुढच्या वेळी अगदी अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्री पद देऊ असंही सांगतील.