Jitendra Awhad on Ajit Pawar NCP Crisis: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटासह, निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. जर 2019 पासून वाद सुरु झाला तर मग अजित पवार विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री कसे झाले? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसंच कोणता संजय निवडणूक आयोगाला जाऊन ही विचारणा करत आहे? असंही विचारलं.
निवडणूक आयोगाने मोठे घोटाळे करुन ठेवले आहेत. आम्ही पर्याय दिले होते अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, "शरद पवारांना संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जात आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याची गरज आहे. आम्ही दिलेल्या पर्यायांचा कागदपत्रात साधा उल्लेख केलेला नाही. हे त्यांनीच लिहिलं आहे का याबद्दलही शंका आहे. जर निवडणूक आयोगासारखी संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीरपणे निर्णय घेणार असेल तर हे धक्कादायक आहे".
"आम्ही पर्यायच दिला नाही इतकं खोटं निवडणूक आयोग कसं काय बोलू शकतं? पण शरद पवारांना संपवण्यासाठी, राजकीय वजन घटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या गेल्या आहेत याची निवडणूक आयोगाला कल्पना नाही. 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं अजित पवार कंपनीला शोभत नाही," असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. जो माणूस मरणासाठी प्रार्थना करु शकतो तो काहीही करु शकतो अशी टीकाही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाने कागदपत्रांचा अभ्यासच केला नाही. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक पेपरमधील प्रत्येक वाक्य संशयास्पद आणि वादग्रस्त आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एका खोलीत बसून तुम्ही हा राष्ट्रीय पक्ष आमचा, हा आमचा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही. नोटीस कोणाला पाठवली? त्याची प्रत कुठे आहे? संविधानाप्रमाणे काहातरी झालं पाहिजे. निर्णय कशाच्या आधारे दिला आहे? अशी विचारणा आव्हाडांनी केली आहे.
"सुनील तटकरेंनी राष्ट्रीय सरचिटणीस, प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानले आहेत. अजित पवारांचं शरद पवारांबद्दल ट्वीट आहे. ते नेहमी शरद पवारांच्या राजकीय उंचीबद्ल बोलत होते. मग निवडणूक आयोगाला कोणत्या संजयने सांगितलं आहे. 2019 पासून वाद होते सांगणारा हा कोणता संजय आहे?," असंही त्यांनी विचारलं. आम्हाला काहीही अपेक्षा नाहीत. कोणत्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायलयात जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्हीही महापत्रकार परिषद घेणार आहोत. सगळ पुराव्यानिशी दाखवणार आहोत. आजपासून आम्ही जनतेत जाणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. निवडणूक आयोगाने कट रचून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अजित पवार आणि गँग कारणीभूत आहे असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.