Sharad Pawar Faction Name And Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं आहे. नावाबरोबर पक्षाचं चिन्ह म्हणजेच घड्याळ सुद्धा अजित पवार गटाचे असेल असं निवडणूक आयोगाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामध्ये सांगितलं. आयोगाने हा निकाल देताना शरद पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातील अर्ज करण्यासाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळेच आता शरद पवार गट काय नावं आणि चिन्हं देणार याबद्दल उत्सुकता लागलेली असतानाच यासंदर्भातील तयारी शरद पवार गटाने केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात येणारी शरद पवार गटाचं नावं आणि चिन्ह कोणतं असेल याबद्दलची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार गटाला काय नाव द्यावं यासंदर्भातील चर्चेमध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं नाव त्यांच्या पक्षाच्या नावात आहे तसं नवीन पक्षाचे नाव घेताना पक्षाच्या नावात शरद पवार नाव असावे यासाठी अनेक नेते आग्रही असल्याचं समजतं. त्यामुळेच शरद पवारांच्या गटाची नाव निवडणूक आयोगाकडे दिलं जाणार आहे ते नाव 'राष्ट्रवादी शरद पवार' असं आहे. यापूर्वी शरद पवार गटाकडून ज्या 3 पर्यायांची चर्चा होती त्यपैकी 2 नावांमध्ये शरद पवारांचा उल्लेख असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'राष्ट्रवादी शरद पवार', 'मी राष्ट्रवादी' आणि 'शरद पवार स्वाभिमानी पक्ष' असे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र आता 'राष्ट्रवादी शरद पवार' हे नाव निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा
तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने या चिन्हाच्या जागी शरद पवार गट कोणतं चिन्ह घेणार याबद्दलही शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. सुरुवातीला शरद पवार गट 'कपबशी', 'सूर्यफूल', 'चष्मा' आणि 'उगवता सूर्य' असे पर्याय देणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता 'वटवृक्ष' हे चिन्ह शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> 'राष्ट्रवादी अजित पवारांची' निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, 'हा निर्णय..'
आज दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेपर्यंत हे पर्याय शरद पवार गटाने सोपवले नाहीत तर आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला अपक्ष म्हणून लढावं लागेल. आज सकाळपासूनच शरद पवार गटाचे आमदार आणि नेत्यांच्या बैठकींचं सत्र सुरु आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून आता अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विनंतीचं पत्र पाठण्याच्या तयारीत आहेत.