'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन

"महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला. 

Updated: Feb 24, 2024, 07:24 PM IST
'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन title=

Ajit Pawar Pune Speech : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला  ‘तुतारी’ वाजवणारा माणूस’ हे चिन्ह पक्षचिन्ह म्हणून दिले आहे. या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले होते. या कार्यक्रमानंतर भाजप, मनसे यापाठोपाठ आता अजित पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यातील भोर या ठिकाणी अजित पवारांची सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी "कुठे भावनिक होऊ नका, घड्याळाला मतदान करा", असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

"नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय"

"देशात पुन्हा एकदा महायुतीचेचं सरकार आणायचं आहे. महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला. त्यात 65 टक्के लोकांनी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असे म्हटले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, हे लक्षात ठेवा", असे अजित पवार म्हणाले. 

"गेल्या कित्येक महिन्यांपासून अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. आता त्यावर अजित पवारांनी टोला लगावला आहे. समाजातील गरीब घटकाला डोळ्यासमोर ठेवून विकास विकास आणि विकास हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणार आहे, ही गोष्ट पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी सांगतो. उगाचच उणी धुणी काढण्यापेक्षा आपलं विकासाचं ध्येय सोडू नका. मी आतापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे. इथे एखाद्याला एकवेळ व्हायला नाकी नऊ येते", असे अजित पवारांनी म्हटले. 

"यंदा धरणांची परिस्थिती चांगली नाही"

"बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी देण्याचा प्रयत्न केला. मी कामाचा हापलेला आहे. गेले 32 वर्ष मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो, आताच राजीनामा दिला. मी कामाचा माणूस आहे, मी कडक बोलत असतो. त्यातूनच माझं नाणं खणखणून वाजत असते. पालकमंत्री पदाचा फायदा 13 तालुक्यातील नागरिकांना व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. गेले एक वर्ष मी सत्तेबाहेर होतो. आता येत्या मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागल्यावर काही गोष्टीना निर्बंध येतात. कालवा सल्लागार समितीच्या आज मी सात बैठका घेतल्या. यंदा धरणांची परिस्थिती चांगली नाही", असेही अजित पवारांनी सांगितले. 

"बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी देण्याचा प्रयत्न केला. उद्याचा महायुतीचा उमेदवार जो कुणी असेल त्याला मतदान करा, त्याची निशाणी घड्याळ असणार आहे, अशी नम्र विनंती करायला आलो आहे. आपल्याला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही विरोधकांना लगावला.