सांगली: इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. अखेर आज पहाटे पोलिसांनी खंडेराव जाधव यांना ताब्यात घेतले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील करोनाबाधित कंटेन्मेंट झोनमध्येच इस्लामपूर नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत चौकशी सुरू झाल्यावर २८ एप्रिल २०२० रोजी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट केबिनमध्ये घुसून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता.खंडेराव जाधव यांनी प्रज्ञा पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला बघून घेतो, तुझ्या कुटुंबाला बघून घेतो, अशी धमकी खंडेराव जाधव यांनी सर्वांदेखत दिली. यानंतर प्रज्ञा पवार यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग यांच्यासह दहा जणांना पत्र पाठवून तक्रार केली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, खंडेराव जाधव यांच्याशी संबंधित बारवरही कारवाई करण्यात आली आहे. या बारचा परवाना खंडेराव जाधव याच्या भावजयीच्या नावावर आहे. हॉटेल न्यू राजभवन बिअर बारमधून बंद कालावधीमध्येही मोठया प्रमाणात मद्य विक्री केल्याचे दिसून आले आहे. विदेशी मद्याच्या बाटल्या आणि बियरच्या बाटल्यांची तफावत आढळली आहे. त्यामुळे बियर बारचा परवाना सुद्धा कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.