'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

शिरुर मतदारसंघात विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने आव्हान दिल्याने चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.   

सागर आव्हाड | Updated: Jun 5, 2023, 02:30 PM IST
'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला title=

Loksabha Election 2023 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशा, शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर (NCP) आतापासूनच डोकेदुखी वाढली होती. विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या उमेदवारीला माजी आमदार विलास लांडे (vilas lande) यांनी  आव्हान दिलं. त्यामुळे आधीच आढळरावांसारख्या तगड्या उमेदवाराचं आव्हान असताना लांडे आणि कोल्हेंमध्ये राष्ट्रवादी तह कसा घडवून आणणार? उमेदवार निवडण्याच्या चक्रव्युहातुन राष्ट्रवादी पक्ष कसा बाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. 

बैठकीत उमेदवार ठरला
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिरूर मतदार संघाच्या बैठकीत अखेर यावर तोडगा काढण्यात आला. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. ते निवडणूक लढविणार नसल्याचं देखील सांगितल जात होतं. पण आत्ता आजच्या बैठकीत पवार यांनी कोल्हे यांना पुन्हा एकदा तयारीला लागा असं सांगितल्याने इतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

साहेब सांगतिल ते धोरण
याबाबत कोल्हे म्हणाले की आज पवार साहेबांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. 'साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण' असणार आहे .कला क्षेत्रात काम करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच विषयावर इतर सर्व पक्षातील नेते मंडळींची भेट होत असते.यातून वेगळं कोणताही अर्थ काढू नये .माणूस महत्त्वाचं नसून पक्ष महत्त्वाचं आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल अस देखील यावेळी कोल्हे म्हणाले. 2019 साली जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा प्रश्न वेगळे होते. आणि आज त्यातील 2 प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. आज महाविकास आघाडी म्हणून मोठी ताकद सोबत असल्याने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असं देखील यावेळी कोल्हे म्हणाले.

'भावी खासदार' पोस्टरमुळे चर्चा
राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीमध्ये लोकसभा उमेदवार म्हणून पोस्टर्स लावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेले माजी आमदार लांडे हे शिरूरमधलं तसं तगडं नाव. त्यामुळेच संसदेच्या प्रतिमेसह लांडेंचा फोटो असलेले 'भावी खासदार' अशी पोस्टर्स अख्ख्या शिरूरमध्ये लागल्यानं चर्चा रंगली. खुद्द लांडेंनीही याला दुजोराच दिला होता. पण चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.