रायगडः जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या काही भगात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळं अनेक शेती-बागांचे नुकसान झाले आहे. तर, झाडे उन्मळून पडल्यामुळं काही ठिकाणी माणसे दगावली आहेत. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची भीती हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळाचा अंदाज वर्तवल्यानंतर रायगड जिल्ह्यात जुनमध्ये चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे.
रविवारी दिवसभरात राज्याच्या विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. काही ठिकाणी वीज कोसळून जिवितहानीदेखील झाली आहे. आज ५ जून रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने कोकण किनारपट्टीवर वादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं आधीच दक्षता घेत मच्छीमारांच्या बोटी परत बोलावण्यात आल्या आहेत. तसंच, समुद्र किनारी चालणारे वॉटर स्पोर्टस् देखील बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. रुग्णालये, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. त्यामुळं किनारपट्टीवर वेगाने वारे वाहतील. तर चक्रीवादळामुळं जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, चार ते पाच दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रविवारी संध्याकाळच्या सुमारास किल्ले रायगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका शिवप्रेमीचा मृत्यू झाला आहे. प्रशांत गुंड असं या पर्यटकाचे नाव आहे. २९ वर्षीय प्रशांत मुळचा सोलापूरचा असून तो सध्या पुण्यात वास्तव्यास होता. तो मित्रासोबत रायगडावर फिरण्यासाठी आला होता. तिथून परतत असताना त्याच्यावर दरड कोसळली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.