NMMTचा मोठा निर्णय, उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका

Navi Mumbai NMMT Bus Service: नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बससेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2024, 12:45 PM IST
NMMTचा मोठा निर्णय, उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका  title=
Navi mumbai nmmt bus service to Uran closed for an indefinite period

Navi Mumbai NMMT Bus Service: नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी आजपासून बंद करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती. त्यानंतर देखील उरणमध्ये जाणाऱ्या बसमधील चालकास धमकी व मारहाणीच्या घटना सुरूच होत्या. नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण पसरले होती. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी उरणला जाणारी बस सेवा बंद करण्याची मागणी केली होती. 

कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर कामगारांची सुरक्षितता महत्वाची असल्याने उरण मार्गावर धावणारी 30 आणि 31 नंबरची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी योगेश कडुस्कर यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. या मार्गावरील बसमधून रोज 7000 प्रवासी प्रवास करत होते. नवी मुंबई परिवहन व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. परिवहन पुन्हा बससेवा कधी सुरू करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

उरण मार्गावरील बस बंद करण्याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी बैठक आयोजित करण्यात आहे. या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आजपासून उरण मार्गावर धावणारी 30 व 31 नंबरची बससेवा बंद करण्यात येणार आहे. 

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई परिवहनाच्या बसचा अपघात झाला होता. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. एनएमएमटी बसने टेम्पो आणि बाइकला दिलेल्या धडकेनंतर एकाचा मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी झाला होता. गावकऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावणार बस

12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण करण्यात आले आहे. लवकरच एमटीएचएलवर एनएमटी बससेवा प्रारंभ करणार आहे. अटल सेतूवरुन नवी मुंबई परिवहन विभागाची बस धावणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बस क्रमांक 155 खारकोपर बेल्ट आणि उल्वे या मार्गावरुन नेरूळ ते मंत्रालयापर्यंत असणार आहे. 

बस क्रमांक 155 ही वातानुकुलित असून खारकोपर ते मंत्रालयापर्यंत आहे. मात्र आता ही बससेवा नेरूळहून सुरू होणार असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे मुंबईत पोहोचणार आहे. नेरूळ ते मंत्रालयापर्यंतच्या 52 किलोमीटरच्या प्रवासासाठी 90 रुपये तिकिट भाडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.