नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिकमधील (Nashik) महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात टँकमधून ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) झाल्याने आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला.  

Updated: Apr 21, 2021, 04:43 PM IST
नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश title=

मुंबई : नाशिकमधील (Nashik) महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात टँकमधून ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) झाल्याने आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाकडून ही ऑक्सिजनची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरुआहेत. राज्य सरकारकडून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचेदेखील त्यांनी जाहीर केले आहे. या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही. पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!,  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र शोकमग्न आहे! - CM उद्धव ठाकरे 

नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरु आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेड्स नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!,  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन पुढे जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. अशा घटना भविष्यात घडू नये, आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री सांगितले. यापुढे प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातील अडचणी तात्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी - अजित पवार

ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.